गोंदिया: सामाजिक वनीकरण विभाग, गोंदिया अंतर्गत मौजा आसोली येथील गट क्रमांक 164 (समशानभूमी) येथे वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक महेंद्र सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.

सामाजिक वनीकरण विभागाने जुलै 2025 मध्ये मनरेगा (MREGS) योजनेअंतर्गत या परिसरात पाच घटकांमध्ये सुमारे 1,000 रोपांची लागवड केली होती. या रोपांमध्ये आंबा, बेल, पेरू, जांभूळ, कडुनिंब, कदम, पारिजात आदी विविध प्रजातींचा समावेश आहे. या रोपांचे संरक्षण व संवर्धन पुढील तीन वर्षे सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येणार असून त्यानंतर हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला जाणार आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून 29 जून 2026 रोजी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त रोपण क्षेत्राच्या बाह्य सीमेवर गावातील महिलांच्या हस्ते 11 वटवृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान वटवृक्षाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. वटवृक्ष हा दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जात असल्याने त्याचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समशानभूमी परिसरातील रोपांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी वटसावित्री पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करत राजा सत्यवान आणि राणी सावित्री यांची प्रेरणादायी कथा सांगण्यात आली. निष्ठा, धैर्य आणि श्रद्धेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
